डायरीची पाने: उपेक्षित सुगंधाचे अंतरंग

0
17
डायरीची पाने:  उपेक्षित सुगंधाचे अंतरंग


इंद्रजित भालेराव3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

दुष्काळात तगणारा, कुठल्याही जमिनीत वाढणारा अन् उन्हाला रोखत हिरवेपण फुलवणारा वृक्ष म्हणजे लिंब. कडक उन्हात सावली देत हा तापसी उभा असतो.

आठ दिवसांपूर्वी शिमगा झाला अन् आठ दिवसांवर पाडवा आलेला आहे. शिमग्याच्या दिवशी थंडी संपते. होळीच्या अग्नीत थंडी जळून जाते आणि तिथपासून उन्हाळा सुरू होतो, असं गावातले जुने लोक म्हणायचे. होळीच्या अग्नीला भिऊन थंडी घोंगडी पांघरून पारामागं बसते नि दसऱ्याच्या दिवशी ती घोंगडी काढून बाहेर पडते, असंही म्हटलं जायचं. या वर्षी खरोखरीच शिमग्याच्या दिवसापासून उन्हाळा एकदम कडकायला सुरुवात झाली.

उन्हाळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधतात त्या आमराया. सगळीकडं आंब्याच्या झाडाला कैऱ्यांचे घोस लटकलेले असतात. पाखरांसह सगळ्यांचंच लक्ष त्या झाडांवर जडलेलं असतं. आधी महिनाभर या आमरायांतल्या मोहराच्या गंधाने सगळा आसमंत धुंद करून टाकलेला असतो. सगळीकडं शिवारभर आंब्याच्या फुलोऱ्याचा सुवास दरवळत असतो. आता हा फुलोऱ्याचा गंध संपून, कैऱ्या लागून आंबे मोठे व्हायला सुरुवात झालेली असते. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतशी आमराई पक्व होत जाते. फळं पाडाला येत जातात अन् सगळ्यांचं लक्ष तिथंच लागलेलं असतं.

याच काळात शिवारात उपेक्षित असलेल्या एका वृक्षालाही फुलोरा आलेला असतो. त्याचाही गंध शिवारभर दरवळतो. पण, तिकडं कुणाचं फारसं लक्ष नसतं. हा वृक्षही दुर्लक्षित नि हा गंधही उपेक्षित राहतो. खरं तर आंब्याच्या मोहरापेक्षा मला या वृक्षाच्या मोहराचा गंध जास्त वेड लावतो. या झाडाखालून जाताना डोळे मिटून मी थोडा वेळ उभा राहतो अन् छाती भरभरून पुन्हा पुन्हा तो उग्र- कडू गंध छातीत भरून घेतो. वासाची अॅलर्जी असलेल्या माझ्यासारख्याला या गंधाने मात्र छाती मोकळी झाल्यासारखी वाटते. हा औषधासारखा गंध देणारा वृक्ष म्हणजे कडुलिंब. कुणी त्याला कडुनिंबही म्हणतात. तर महाराष्ट्रात जागोजाग या कडुलिंबाचे वृक्ष फुललेले असतात.

आंब्याची झाडं लावून, त्याला पाणी घालून आमराया वाढवाव्या लागतात. पण, या लिंबाच्या झाडाला मात्र कोणी वाढवत नाही. किंबहुना शक्य तेव्हा तोडण्याचा प्रयत्न करतात. मिळेल त्या जागेत ही झाडं फुलत, वाढत राहतात. त्याला कुणी पाणी घालायची, निगा ठेवायची गरज नसते. कडूपणामुळं शेळ्या-मेंढ्या अन् गायी-म्हशीही त्याला तोंड लावत नाहीत. त्यामुळं तो आपोआपच सुरक्षित राहतो. त्याची मुळं खूप खोल खोल जातात, जमिनीतला ओलावा मिळवत राहतात. त्यामुळं भर उन्हाळ्यात हिरव्यागार पानांनी हा वृक्ष बहरलेला असतो. सोबत हा उग्र, मादक गंध फुलोऱ्याला लगडलेला असतो.

हा वृक्ष एरवी ‘कडु’निंब म्हणून उपेक्षित असला तरी आपल्या परंपरेने मात्र त्याला न्याय दिला आहे. पाडव्याच्या दिवशी गुढीमध्ये सन्मानाने या फुलांचा तवर लिंबाच्या डहाळीसह लावला जातो. त्या दिवशी गूळ-डाळीचं जे पन्हं करण्यात येतं त्यातही हा फुलोरा टाकलेला असतो. झाडाला याच फुलोऱ्यातून लिंबोळ्या लागतात. आंब्यावर हजारो कविता लिहिल्या गेल्या; पण लिंबोळ्यांवर फारशा कुणी कविता केल्या नाहीत. ग. ह. पाटील यांच्यासारख्या एकेकाळी शेतकरी जीवनावर कविता लिहिणाऱ्या कवीने मात्र आपल्या काव्यसंग्रहाचे नावच ‘लिंबोळ्या’ असं ठेवलं.

महाराष्ट्राच्या भूमीतल्या खास वृक्षांपैकी लिंब आणि बाभूळ या उपेक्षित वृक्षांची आवर्जून दखल घ्यावी लागते. त्यांची कुणीही लागवड करत नाही, उलट तोडताडच करतात. लाकडासाठी सतत त्यांची तोड होते. बाभळीपेक्षा लिंबाचं लाकूड जास्त मजबूत, कणखर नि सागाच्या खालोखाल उपयुक्त समजलं जातं. लाकडात कडूपणा असल्यामुळं त्याला कीडही लागत नाही. म्हणून बांधकामासाठी या वृक्षाचा खूप उपयोग होतो. पण, कोणीही मुद्दाम लिंब लावलेत आणि ते राखलेत, असं मात्र होताना दिसत नाही. आपण त्याची उपेक्षा करतो, पण तो सतत आपल्या उपयोगाला येतो. आमच्या गावातले एक गृहस्थ रोज सकाळी मूठभर लिंबाचा पाला चावून चावून खात. आपल्या निरोगी प्रकृतीचं रहस्य हेच आहे, असं ते लोकांना सांगत. ते कुठल्याही साथीच्या रोगाला बळी पडत नसत. त्यांची कांती सतेज दिसायची, वय कुणीही ओळखू शकत नसे. लोक म्हणायचे, ‘साप चावला तरी त्याचं विष याला बाधणार नाही, इतकं कडूपण या माणसानं पचवलं आहे.’

दारात लिंबाचं झाड असणं म्हणजे प्राणवायूचा पुरवठादारच अंगणात उभा आहे, असं समजलं जात असे. कुठल्याही रोगाच्या आक्रमणाला थोपवणारा तो चरकमुनीच समजला जात असे. गोडानं होणारे सगळे आजार दूर करणारा हा कडू वृक्ष आयुर्वेदाचा मूलाधार समजला जातो. आंबे आणि लिंबोळ्या एकाच काळात पिकतात. त्यामुळं आंब्यावरचा उतारा म्हणून वडील आम्हाला पिकलेल्या लिंबोळ्या खायला सांगत. आंबे खाऊन आलेल्या गरमीने अंगावर उठलेले पुरळ यामुळं नष्ट होतात, असं ते म्हणत. म्हणजे आंब्याची गरमी उतरवणाऱ्या या लिंबोळ्या शीतल प्रकृतीच्या होत्या. औषध आणि सौंदर्यप्रसाधन कंपन्या लिंबोळ्यांचा उपयोग करू लागल्यापासून त्यांना चांगलाच भाव आला. लोक लिंबोळ्या गोळा करून किलोवर विकू लागले. त्या शहरात नेऊन ठोक विकणारे लहान लहान व्यापारी गावागावात तयार झाले. गोरगरिबांना रोजगार नसलेल्या काळात लिंबोळ्या रोजगार देऊ लागल्या.

नुकत्याच जन्मलेल्या कोवळ्या जिवाला आणि स्मशानात चाललेल्या वृद्ध देहाला लिंबाच्या पाल्यात लपेटून ठेवलं जातं. अंत्यसंस्कार करून आलेल्या प्रत्येकाच्या हाती लिंबाची डहाळी दिली जाते. म्हणजे जन्मत:च माणसाचा पहिला संबंध येतो तो लिंबाशी नि जाताना शेवटच्या संबंध येतो तोही लिंबाशी. असा आदी-अंती आपल्याला व्यापून असलेला वृक्ष आपण इतका उपेक्षित का ठेवतो? ही माणसाची सगळ्यात मोठी कृतघ्नता नाही काय? दुष्काळात तग धरणारा, सर्व प्रकारच्या जमिनीत वाढणारा अन् कडक उन्हाला प्रतिरोध करीत गच्च हिरवेपण फुलवत नेणारा हा लिंब. कडक उन्हात रस्त्यावर नि बांधावर लोकांना सावली देत हा तापसी उभा असतो. फुलोऱ्यासह पानाच्या फांदीला निसर्गाने दिलेला आकार म्हणजे चित्रकलेचा एक अलंकारच आहे. चित्रकारांचं मात्र जसं त्याकडं अजून फारसं लक्ष गेलेलं नाही तसं या वृृक्षावर कुणी कवींनी फारशा कविताही केलेल्या नाहीत. पण, जात्यावरच्या ओव्यांमध्ये मात्र तो आला आहे. तिथं दळणाऱ्या बायांना आयुष्याच्या उन्हाळ्यात आपला भाऊ लिंबाच्या वृक्षासारखा आठवतो. त्या नेहमीच या वृक्षाकडं लेकुरवाळ्या भावाच्या रूपात पाहतात. जात्यावरच्या एका ओवीत ती म्हणते…

लिंबाला आल्या लिंबोळ्या,

खाली झालं अंथरून।

भावाला झाल्या लेकी,

गेला बहिणी विसरून।।

लिंबाच्या लिंबोळ्या,

लिंबाला आले घड।

मायबापाला लेकी गोड,

भावाला बहिणी जड।।

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link