गोष्ट सांगतो ऐका…: परीक्षा

0
14
गोष्ट सांगतो ऐका…: परीक्षा


अरविंद जगताप4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सुदैवाने परीक्षक म्हणून आलेले शिक्षक फारच प्रेमळ होते. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना केली.. ‘तुम्ही काय करायचं ते करा, पण कृपा करून मला उत्तर विचारू नका. तेवढं मी करू शकत नाही. कारण मी संगीत शिक्षक आहे.’ सगळ्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाच ंकौतुक वाटलं. शाळेतल्या मुलांनी डबे उघडावेत, एवढ्या निरागसपणे सगळे आपापल्या सोबत आणलेल्या चिठ्ठ्या उघडू लागले. एकंदरीत पहिला पेपर उत्तम गेला. मग दुसरा पेपरही. सगळ्याच प्रश्नाच्या कॉप्या असल्यानं पूर्ण पेपर लिहावा लागत होता, हीच काही मुलांसाठी त्यातल्या त्यात अडचणीची गोष्ट होती.

सुशील बारावीत होता तेंव्हाची गोष्ट. एक तर त्याला सायन्स घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. पण, त्याच्या वडिलांचे मित्र असलेल्या देहाडे सरांनी गल्लीत नवीनच क्लासेस सुरू केले होते, म्हणून त्याला बळेच सायन्स घ्यायला लावलं. दोन्ही मामा इंजिनिअर असल्यामुळं आईने सुशीलच्या लहानपणीच देवाला, ‘मुलगा इंजिनिअर होऊ दे!’ म्हणून नवस बोलला होता. नवसासाठी तरी त्यानं सायन्स घेणं आवश्यक होतं. आई – वडील एकच वाक्य ऐकायला ऊत्सुक होते.. ‘माझ्या यशाचं सगळं श्रेय आई-वडिलांना आणि शिक्षकांना आहे.”

सायन्स घेतल्यावर अचानक सगळं काही इंग्रजीत सुरू झालं. गणित तर एवढं अवघड कधीच वाटलं नव्हतं सुशीलला. दोन वर्षात त्याने इंजिनिअर होण्याचं स्वप्न विसरून फक्त पास होण्याचं स्वप्न बघायला सुरूवात केली. मराठी हा एकमेव विषय त्याला दिलासा देणारा होता. पण, तो तुटलेल्या स्लीपरला सेफ्टी पिन जोडल्यासारखा. किती साथ देणार? सुशीलच्या वडिलांनी एक दिवस त्याला जवळ घेऊन सांगितलं, ‘तू मेरीटमध्ये येशील आणि गुणवंत मुलाचा बाप म्हणून माझा सत्कार होईल, असं काही माझ्या डोक्यात नाही. ते शक्यही नाही. फक्त एक गोष्ट करू नकोस. ती म्हणजे नापास होऊ नकोस. आपल्या खानदानात कुणी नापास झालं नाही. तू नापास झाला तर माझ्यावर आत्महत्या करायची वेळ येईल..’

आता सुशीलला बारावीच्या परीक्षेपेक्षा खानदानाच्या इज्जतीचं जास्त टेन्शन आलं. मुळात गणित, विज्ञान, इंग्रजी यात खानदानीची इज्जत हा एक्स्ट्रा विषय कुठून आला? पण वडील काय, शेजारीपाजारीही सुशीलला अधूनमधून बोलायचे. खूप लोक आपल्याला बोलताहेत हे बघून सुशील खजील झाला. मग त्यानेच लोकांशी बोलायला सुरूवात केली. पन्नासएक लोकांशी बारावीबद्दल चर्चा केली. दिवसरात्र संशोधन केलं आणि त्याच्या मते एक उत्तम निर्णय घेतला.

शहराबाहेर असलेल्या एका छोट्या गावातल्या कॉलेजमध्ये त्याने बारावीसाठी प्रवेश घेतला. कॉलेजवाल्यांना फक्त कागदावर विद्यार्थी संख्या दाखवायची असल्यानं विद्यार्थी कॉलेजमध्ये आलाच पाहिजे, अशी काही अट नव्हती. मुलं तिथे थेट परीक्षेलाच जायची. त्या कॉलेजच्या मुलांचं सेंटरही तिथंच गावात असायचं आणि तिथं कॉपी करायला अडचण नसायची. थोडे जास्त पैसे खर्च होतात. पण, सुशीलने तर चक्क वडिलांची सोन्याची चेन गहाण ठेवली होती. वडील ती वापरायचे नाहीत म्हणून त्यांना लवकर लक्षात येणार नव्हतं. आधीच सुशीलचा अभ्यासात रस उरला नव्हता, त्यात कॉपी करायला एवढं सुरक्षित कॉलेज मिळाल्यावर तर तो अगदी निर्धास्त झाला. एकदा सुशीलला वाटलं, सरकार अशा कॉपीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॉलेजांना परवानगी देतं, तर थेट विद्यार्थ्यांनाच कॉपी करायला परवानगी का देत नाही?

परीक्षा जवळ आली. कुठल्या विषयाला कुठल्या कॉप्या न्यायच्या, हे समजण्यासाठी तरी अशा विद्यार्थ्यांना पुस्तक वाचावं लागतं. कुठल्या प्रश्नाची कॉपी कुठं ठेवलीय, एवढी स्मरणशक्ती लागते. सुशीलकडं तेवढी समज होती. सगळं काही सुरक्षित असलं, तरी पहिल्या पेपरला चिंता होतीच. एवढ्या सगळ्या चिठ्ठ्या घेऊन सुशील पहिल्यांदाच परीक्षेला गेला होता. सुदैवाने तिथं परीक्षक म्हणून आलेले शिक्षक फारच प्रेमळ होते. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना केली.. ‘तुम्ही काय करायचं ते करा, पण कृपा करून मला उत्तर विचारू नका. तेवढं मी करू शकत नाही. कारण मी संगीत शिक्षक आहे.’ सगळ्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाच ंकौतुक वाटलं. शाळेतल्या मुलांनी डबे उघडावेत, एवढ्या निरागसपणे सगळे आपापल्या सोबत आणलेल्या चिठ्ठ्या उघडू लागले. एकंदरीत पहिला पेपर उत्तम गेला. मग दुसरा पेपरही. सगळ्याच प्रश्नाच्या कॉप्या असल्यानं पूर्ण पेपर लिहावा लागत होता, हीच काही मुलांसाठी त्यातल्या त्यात अडचणीची गोष्ट होती. एरवी त्या मुलांनी फार फार तर दोन-चार प्रश्न सोडवले असते आणि बाकी सोडून दिले असते. पण, आता सगळाच्या सगळा पेपर सोडवत होते. चौथ्या पेपरच्या वेळी तर सुशीलला वाटू लागलं की, आपण गुणवत्ता यादीतच येणार. कारण त्यानं चारही पेपरमध्ये एकही उत्तर चुकीचं लिहिलेलं नव्हतं. एकदा एक परीक्षक म्हणाले, ‘देवाला तरी घाबरा.. सगळीच उत्तरं गाइडमध्ये बघून लिहाल, तर लक्षात येईल तपासणाऱ्याच्या. सेंटर बदनाम होईल आमचं..’ मुलांनी उत्तरं योग्य लिहिल्यावरही परीक्षेचं सेंटर बदनाम होऊ शकतं, हे परीक्षा पद्धतीचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. तर, नापास होऊ असं वाटणारा सुशील आता आपण मेरीटमध्ये येऊ, नशीब बदलायला वेळ लागत नाही, असा विचार करू लागला होता.

आणि एक दिवसही लागला नाही नशीब बदलायला. परीक्षा केंद्रावर नेमकी गणिताच्या पेपरलाच भरारी पथकाची एन्ट्री झाली. अचानक गारांचा पाऊस पडावा, तशा कॉप्या खिडकीतून बाहेर पडू लागल्या. अवघ्या पाच मिनिटांत परीक्षा केंद्राच्या आवारात पानच पानं झाली. पण, सुशील जरा जास्तच कमनशिबी होता. भरारी पथकातल्या एकाने त्याला कॉपीसह पकडलं. बाहेर नेलं. त्याचं हॉलतिकीट जप्त केलं. एका क्षणात सगळा खेळ खलास झाला होता. नापास होण्याची भीती असलेला मुलगा मेरीटमध्ये येऊ की काय, अशी भीती बाळगत आता थेट परीक्षेतून बाद झाला होता. गळ्यातली चेन, वडिलांचं बोलणं, शेजाऱ्यांचे टोमणे आठवत होते. सुशील नकळत भरारी पथकाच्या मागे चालू लागला. संस्थेच्या लोकांचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं, पण ते ऐकत नव्हते.

भरारी पथकाचे लोक निघून गेले. एका जीपमध्ये. सुशील त्यांच्या मागे निघाला. बाइकवर. अर्धा-एक तास झाला. पुढे एका निर्जन रस्त्यात एक छोटी टपरी होती. पथकाची गाडी थांबली. तिघे शिक्षक उतरले. गरमागरम भजी सांगितली. एकाने फोन चार्जिंगला लावला. दुसरा शेअर मार्केट चेक करू लागला. तिसरा शिक्षक लघवीला गेला. मागेच. सुशीलचं लक्ष होतं. अचानक काय मनात आलं आणि भजीवाल्याचा कांदा कापायचा चाकू घेऊन तो थेट लघवीला गेलेल्या शिक्षकाच्या मागे गेला. त्याच्या मानेला चाकू लावला. हलला तरी रक्ताची धार लागली असती. सगळे घाबरून गेले. इतर दोघे ओरडू लागले.

पण, आपल्या सहकाऱ्याला वाचवायला पुढे यायची त्यांची हिंमत झाली नाही. एव्हाना शिक्षकाच्या लक्षात आलं होतं की, मघाशी कॉपी पकडली तोच पोरगा आहे. शिक्षक आता गयावया करू लागले. ‘आपण काही सेटलमेंट करू,’ म्हणू लागले. आपण आजच नेमके कर्तव्याला एवढे का जागलो, याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर ठळक दिसू लागली. ते माफी मागू लागले. पण, सुशीलला त्याचा काही उपयोग नव्हता. वेळ निघून गेली होती. त्याने तिघांनाही आपल्या खिशात असलेला गणिताचा पेपर दिला. कोरे कागद दिले आणि ‘माझ्यासमोर हा पेपर सोडवा,’ म्हणाला. पास झाला तर सोडणार आणि नापास झाला तर मारणार. शिक्षकांना घाम फुटला. पण, सुशीलने हातातल्या घड्याळात टाइम लावला. कुणी मदतीला येण्याचा प्रश्नच नव्हता. तरी आसपास कुणी मदतीला येतं का, ते बघून तिघेही निमूटपणे पेपर पाहू लागले.

खरं तर तिघेही पहिल्याच काही प्रश्नाला अडले होते. किती वर्ष झाले होते, त्यांचा आणि बारावीच्या गणिताचा संबंधच आला नव्हता. मुळात बारावीतलं गणित किती लोकांना लक्षात राहतं? खूप लोकांना गणितापेक्षा आपल्या एक्सचीच आठवण जास्त असते. तिघे एकमेकांच्या हातातले कागद बघत होते. अचानक त्यांच्यातल्या एकाने मोबाइल फेकून मारला सुशीलला. बाकी दोघे संधीचा फायदा घेऊन सुशीलवर धावून गेले. हातावर, पाठीवर चाकूचे वार झाल्याने तो बेशुद्ध पडला. दवाखान्यात अर्धवट शुद्धीत आलेला सुशील बरळत होता.. “माझ्या यशाचं सगळं श्रेय आई – वडिलांना आणि शिक्षकांना आहे..” सुशीलच्या आधी आईबापाचे डोळे उघडले होते.

(संपर्क- jarvindas30@gmail.com)



Source link