सातारा: सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाच्या कुशीत आणि सज्जनगड च्या पायथ्याला असलेलं गजवडी गाव.. सातारा तालुक्यातील या गजवडी गावाची लोकसंख्या 1500 हून अधिक आहे. या गावामध्ये 600 हून अधिक महिला राहतात. या गावामध्ये एक अनोखा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. जमीन, घराच्या उताऱ्यावर पुरुषांच्या सोबत महिलांची नावे जोडण्यात आली आहेत गजवडी गावातील पुरुष आणि महिलांनी क्रांतीची ज्योत पेटवलीय. नवऱ्याच्या संमतीने बायकोला घरासोबत जमिनीवर समान अधिकार मिळाला आहे.
गजवडीच्या गावकऱ्यांनी पेटवली क्रांतीची मशाल, महिलांची नाव घर आणि जमिनीवर नोंदवली
साताऱ्यातील गजवडी गावात पुरुषासोबत महिलेला समान अधिकार देण्यात आला आहे. या गावातील महिलांच्या नावावर पुरुषांच्या संमतीने संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यात आला आहे. आठ अ चा उतारा, जमिनीचा सातबारा, त्याचबरोबर घरावर देखील महिलांची नावे पुरुषांच्या सोबत लावण्यात आली आहेत. साडेतीनशेहून अधिक महिलांच्या नावावर आता संपत्ती करण्यात आली आहे.
सातारा हा क्रांतीकारांचा जिल्हा आहे. साताऱ्यातून अनेक प्रबोधनाच्या चळवळींची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याच साताऱ्यातील गजवडी गावातील पुरुषांनी आणि महिलांनी क्रांतीची ज्योत पेटवली आहे. यामुळे या गावातील महिला स्वयंभू झाल्या आहेत. काही महिलांनी तर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर काहींनी आपल्या घरातील कर्त्या पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून आपला संसार सुरळीत केला आहे. कुटुंबाचा गाडा दोघे मिळून चालवत आहेत. या क्रांतीमुळे गावातील महिला स्वावलंबी बनल्या आहेत.. पंचक्रोशी मध्ये यांच्या या उपक्रमाचा वेगळा ठसा उमटला आहे.
पंधराशेहून अधिक लोकसंख्येच्या गावामध्ये 600 हून अधिक महिला स्वावलंबी बनल्या आहेत. या उपक्रमामुळे स्वतः महिलांनी कर्ज काढून आपला व्यवसाय सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे गजवडी गावाची चर्चा सातारा सह संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ लागले आहे.
गजवडी गावातील शामल जाधव यांनी त्यांचं नाव घरावर लावल्याची माहिती दिली. कोणती योजना बँकेकडून घ्यायची असेल तर माझं नाव कागदपत्रावर असल्यानं कोणतंही कर्ज सहज उपलब्ध होतं. माझा टेलरिंगचा व्यवसाय आहे, यूट्यूब चॅनेल देखील चालवते, असं शामल जाधव यांनी म्हटलं. गावातील बऱ्याच महिलाना या गोष्टींचा फायदा झालेला आहे.
शुभांगी बळीप यांनी त्यांच्या पतीनं उताऱ्यावर त्यांचं नाव नोंदवल्यानंतर कर्ज मिळायला लागल्याची माहिती दिली. कर्ज काढून दोन ते तीन म्हशी खरेदी केल्याची माहिती देखील शुभांगी बळीप यांनी दिली.
सिंधू राजेंद्र कदम यांनी त्या त्यांच्या पतीसोबत शेती करत असल्याचं सांगितलं. सातबाऱ्यावर नाव आल्यानं फायदा झाल्याचं त्या सांगतात.
सीमा बळीप यांनी गजवडी गावात या उपक्रमाची सुरुवात 2010 पासून सुरुवात झाली होती. सुरुवातीला चार चाकी वाहनावर लाऊड स्पीकर लावून जनजागृती करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या पुढाकारानं शेतजमिनीवर महिलांची नावं लावण्यास सुरुवात झाल्याचं सीमा बळीप यांनी सांगितलं.
आणखी वाचा








