
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तयार केलेला राज्यात शेतकऱ्यांना ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’ वितरित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची विभागातून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज, सोमवारी राधा यांची पदोन्नती करून त्यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) म्हणून बदली करण्यात आली आहे. राधा यांची दोनच महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १९९४ च्या बॅचच्या महाराष्ट्राच्या आयएएस अधिकारी असलेल्या व्ही राधा या तब्बल आठ वर्ष दिल्लीत निती आयोगामध्ये सचिव पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी त्यांची राज्याच्या कृषी सचिवपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान, सध्या कृषी सचिव या पदावर राज्य सरकारतर्फे कुणाचीच नियुक्ती जाहीर करण्यात आलेली नसल्याने व्ही राधा यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे सांगण्यात आले आहे.




