हेमकिरण पत्की8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
माणसाचं आयुष्य म्हणजे काळ, काम आणि वेग यांचा मेळ असतो. हा मेळ ज्याचा त्याचा वेगळा असतो. साऱ्यांची जगण्याची सार्थकता एकच असते, ती म्हणजे जन्मभरच्या पसाऱ्यातून अखेरीस मोकळं असण्याची. आपल्या साऱ्यांची सुरूवात आणि अखेर सारखीच असते. फक्त त्यामधलं जगणं आपापल्या भोगवट्याचं, प्रयासाचं आणि धोरण-दृष्टीचं असतं. इथंच प्रत्येकाचं जगणं दुसऱ्याहून वेगळं वाटू शकतं, वाटतंही. पण, संतांच्या दृष्टीनं पाहिलं तर ते सारखंच असतं.
कबीर काळाविषयी, कर्मभोगाविषयी आणि जीवनगतीविषयी मूलभूत चिंतन करतात आणि आपल्या जगण्याच्या दिशेला उजळ करतात. हे चिंतन आपल्याला भौतिक काळाची सार्थ जाणीव देतं आणि आपण निर्माण केलेल्या आठवणी, संकल्प, स्वप्नं आणि कल्पना या मानसिक काळापासून मोकळं करतं. कबीर म्हणतात…
रात गंवाई सोयकर
दिवस गंवायो खाय।
हिरा जनम अमोल था
कौडी बदले जाय।।
आपली रात्र झोपेत सरते; दिवस खाण्यापिण्यात संपतो. उदरनिर्वाहाची सोय करता करता आपण आपल्या खऱ्या भरणपोषणाचा विचार करत नाही. देहाची तहान-भूक भागवणं एवढंच आपलं जगणं असतं का? की माणसाची याहून अधिक काही वेगळी संवेदना नि चेतना असते? तिचं चिंतन आपल्याकडून घडतं का? कबीर म्हणतात, आपल्याला लाभलेला माणसाचा जन्म एखाद्या अमोल हिऱ्यासारखा आहे. त्याचं मूल्य वेळीच न जाणल्यानं आपण आपल्या जगण्याची स्वाभाविक दिशा हरवतो; चुकीच्या वाटेवरून चालत राहतो. अशी दिशा आणि वाट चुकण्यानं आपल्याला लाभलेल्या माणसाच्या जन्माचा हा अनमोल हिरा मातीमोल होतो. त्याला कवडीचंही मोल राहत नाही. या दोह्यातून कबीर आपल्याला सावधपणे जगण्याची रीत देतात. हे सावधपण आपल्याला खाणं, पिणं, झोपणं, सुखात हरवणं यांतला यथार्थ दाखवणारं आहे. तो कळणं हीच आपल्या जगण्याची स्थिती आहे. ती ध्यानात आली की वाट्याला आलेला काळ फक्त सुखाचं माध्यम होणार नाही, तर तो आत्महित साधण्याचं साधन होईल. आपलं काळाचं भान तीव्र करण्यासाठी कबीर पुढल्या दोह्यात म्हणतात…
काल करे सो आज कर
आज करे सो अब।
पल में परलय होयगी
बहुरि करेगा कब।।
काळाची गती माणसांच्या जाणिवेत येत नाही, ही कबीरांची अनुभूती असल्यानं ते काळगतीचा वेग आपल्याला दाखवतात. जगण्यासाठीचं कर्म करण्याची तातडी आपल्याला समजावून सांगतात. ते म्हणतात… बा माणसा! हे जगणं बेभरवशाचं आहे. पळभरात प्रलय होऊ शकतो. होत्याचं नव्हतं होऊ शकतं. हे जाणून जे उद्या करीन म्हणतोस ते आज कर. आणि आज करणार आहेस ते अगदी आता, या क्षणीच कर. गेलेला क्षण परतून येत नाही. गेलेलं आत्मीय माणूस परतून येत नाही. एकदा असलेलं नाहीसं झाल्यावर पुन्हा हृदयस्थ होत नाही. यासाठीच जगण्याच्या कर्मांची विहित मार्गाने त्वरा करायची. अर्थ आणि काम हे पुरुषार्थ धर्मानं विहित केलेल्या रीतीनं साधून घ्यायचे. हेच आत्महित आहे, यापासून दूर व्हायचं नाही. काळ नुसता व्यतित करायचा नाही, तर तो आत्महितासाठी व्यतित होऊ द्यायचा.
आपल्याला कुठलं कर्म करायला आवडतं आणि कुठलं कर्म केल्यानं आपल्याला अखेरीस समाधान, शांतता लाभते, हेच तर आत्महित कळणं आहे. पण, आपण काळगतीच्या बाबतीत सावध असतो कुठं?
आछे दिन पाछे गये गुरु
सों किया न हेत।
अब पछितावा क्या करैं
चिडियां चुग गईं खेत।।
सुखाचे दिवस येतात आणि जातातही. या सुखाच्या दिवसांत आपल्याला हितोपदेश करणाऱ्याची साधी आठवणही राहत नाही. हितोपदेश करणाऱ्या गुरूंना भेटावं, आज्ञा ग्रहण करावी, आपले मूलभूत प्रश्न त्यांना विचारावेत नि समाधान करून घ्यावं, त्यांच्या सहवासात जगरहाटी मनावेगळी करून वाट्याला आलेल्या आयुष्याचं सार्थक करावं, हे घडत नाही. कबीर म्हणतात, काळ पुढं निघून गेल्यावर पश्चात्ताप करून काय उपयोग? शेत एवढं पिकावर होतं, सुगी दृष्टिक्षेपात होती; पण शेतातल्या पिकांवर उतरलेली पाखरांची भिरी दिसली नाही. पाखरांनी कणसातले दाणे खाऊन नुसत्या धाट्या मागं ठेवल्या. अशा त्या बेसावध माणसासारखी स्थिती काळगती जाणून न घेणाऱ्याची होते. कबीरांचा हा दृष्टांत खूप मार्मिक आहे. आपल्या विहित कर्मांच्या बाबत आपली तत्परता, जाणिवेची तीव्रता आणि सावधानता किती महत्त्वाची आहे, याचं अधोरेखन या दोह्यांतून त्यांनी केलं आहे. ते आपल्यासाठी आत्महिताचं आहे.
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



