कबीररंग: आप ही माली आप बगीचा…

0
20
कबीररंग:  आप ही माली आप बगीचा…


हेमकिरण पत्की4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या भारतवर्षात हजारो संत होऊन गेले. संतांची एक मोठी प्रभावळ इथल्या मातीला तेजाळत राहिली. त्यापैकीच कबीर एक आहेत. त्यांच्या दोह्यांतील, पदांतील प्रतीके खूप प्रत्ययकारी आहेत. आपण निर्माण केलेल्या या भौतिक जगामध्ये आपली चेतना प्रेमाच्या तहानेनं व्याकूळ होते. दोह्यांनी, पदांनी हिरवंगार असलेलं कबीरांचं मरूद्यान आपल्या दृष्टीत येतं, हृदयाचा आधार होतं.

कबीरांचे शब्द बोलीभाषेतील आहेत, साधे आहेत. पण, या शब्दांचं आजच्या जगण्याच्या संदर्भानं पुनरुज्जीवन होऊ शकतं. जगण्याच्या मूळ प्रश्नांनी जे अंकित झाले आहेत अशा साऱ्या अस्वस्थ माणसांसाठी कबीर आत्मीय आहेत. सृष्टीच्या विकसन-विघटनाची दृश्यं, वस्तू आणि व्यक्तीच्या संबंधांची दृश्यं, माणसा-माणसांमधल्या नात्यांची दृश्यं द्रष्ट्यासाठीच तर आहेत. या साऱ्या दृश्यांच्या अनुभवांतून आपल्याला केवळ इंद्रियगत दर्शन घडतं म्हणून बाहेरच्या जगातल्या दृश्यांनी आपण कधी विचलित होतो, कधी प्रभावित होतो. आपल्या जगण्याची स्वाभाविक दिशा आणि गती हरवून बसतो. मात्र, कबीर या दृश्यांचं कसं अवलोकन करतात ते अभ्यासण्यासारखं आहे. अशा अभ्यासातून आपल्या मनाला समजून घेणं शक्य आहे.

कबीरांच्या अवलोकनाचं केंद्र पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की, आपल्या असण्याचा बोध प्रेम आणि मरण यांसारख्या शाश्वत प्रेरणांशी जोडलेल्या आपल्या चेतनेशिवाय शक्य नाही. चेतनेशी जोडलेल्या कल्पना आणि तथ्यांना जाणून घेऊन समोरचं दृश्यजग अवलोकल्याशिवाय नित्यनूतन जगण्याची अनुभूती येत नाही. शुद्ध चेतनेसह कबीर या समग्र अस्तित्वाकडं पाहतात. त्यांना दिसतं की, प्रत्येक जिवाच्या देहाकारात एकच सत्ता नांदत आहे. त्याच्या जीविताच्या अवकाशात एकच पक्षी फडफडतो आहे. पक्ष्याचं मुक्त असणं हेच त्याचं व्यक्त होणं आहे. कबीर म्हणतात…

घट घट में पंछी बोलता,

आप ही डंडी आप तराजू

आप ही बैठा तोलता।

चराचरात चेतनेचा वास आहे. चेतनेशिवाय इथे एकही वस्तू किंवा जीव नाही. आपण आहोत ही जाणीव आणि आपल्या अंतरंगाबाहेरही जग आहे ही जाणीव म्हणजे चेतना होय. पण, जीवांच्या ठायी असलेली ही चेतना सर्वकाळ विकाररहित असते असं नाही. पण, जेव्हा ती मनाच्या भ्रम, भ्रांती आणि अस्तित्व नसलेल्या गोष्टींच्या बोधानं शुद्ध होते तेव्हा कबीरांच्या दृष्टीसारखं आत-बाहेरचा भेद नसलेलं जग तिला दिसू शकतं. या दर्शनात मनानं निर्माण केलेलं द्वैत नसतं. दृश्यांतलं द्रष्टेपण मनाला उमजू शकतं. याचं वर्णन कबीर करतात :

अहंकाराशिवाय असलेली आपल्या असण्याची जाणीव स्वतःच दांडी, तराजू आणि तोलणारा होऊन जाते. ही जाणीव ‘मी’पणाला एकसंधपणे पाहू शकते. कबीरांची ही अद्वैताची अनुभूती आणि अभिव्यक्ती आहे. पण, आपण चेतनेची एकात्मता विसरलेली माणसं विभाजनवादी असतो. आपण दांडी, तराजू आणि आपल्यातला तोलणारा या सगळ्या गोष्टी वेगळ्या समजतो. सोयीचं-सुखाचं वर्गीकरण करतो. आत-बाहेरचं आपलं जग नेहमीच विभागलेलं असतं. दृश्यांचं पृथक्करण करणाऱ्या आपल्या वृत्तीला दर्शनाचा अर्थ उमजत नाही. तो अर्थ अधिक गडद करणारे चरण पुढं येतात…

आप ही माली आप बगीचा,

आप ही कलियाँ तोडता।

या चरणांमधला ‘आप’ हा शब्द विशुद्ध ‘मी’चा सूचक आहे. ‘मी’पण आपल्या असण्याच्या अर्थाचं असतं, तेव्हा माळी, बगिचा आणि कळ्या तोडणारा असे वेगळे घटक असत नाहीत. एकाच चैतन्यबोधाचे ते निदर्शक असतात. ही खरी अस्तित्वाच्या व्यवस्थेतली समता असते. कबीर म्हणतात…

सब में सब बन आप बिराजे,

जड चेतन में डोलता।

सर्व चराचरांत एकच चेतना नांदत असलेली पाहण्यानं दृष्टी स्वतःमध्ये स्थिर होते. ती दृश्याचं ईश्वरनिर्मित प्रयोजन जाणते. निसर्गतः दृश्याचं प्रयोजन द्रष्ट्यासाठीच असतं. कबीरांचं हे सूचन प्रतीकांतून गडद होतं. दृश्यं पाहणारा आपल्या मनाला जाणू शकतो, मनाच्या बंधनांतून मोकळा होऊ शकतो. यासाठीच कबीर मुक्तीसाठीचा बोध घडवतात…

कहत कबीरा सुनो भाई साधो,

मन की घुंडी खोलता।

आपल्या आत-बाहेरच्या जगाला ‘मी’पण बाजूला सारून आपण अवलोकत राहिलो, तर मनाची बंधनं जाणिवेत येऊ शकतात. मन म्हणजे मनाची बंधनं हे कळू शकतं. अशा प्रकारच्या कुठलाही विधी नसलेल्या ध्यानातून आणि मनाच्या अभ्यासावरच्या श्रद्धेतून आपल्या आत असलेल्या अमाप सत्तेची अनुभूती येऊ शकते. बाहेरच्या दृश्यांमुळे ही आतली सत्ता प्रभावित होत नाही हा एक आश्वस्त करणारा बोध आपल्याला घडू शकतो. दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांनी व्याकूळ झालेल्या आपल्यासारख्या अस्वस्थ मनांसाठी ही आत्मदर्शनाची रीत लाभदायक होऊ शकते.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link