डॉ. अमेय पांगारकर4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
खाद्यपदार्थ हा आपल्या सगळ्याचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. नवनवे पदार्थ बनवणं आणि ते चाखणं प्रत्येकालच आवडतं. आता तुम्ही म्हणालं की, ‘एआय’चा विषय सुरू असताना त्यात मध्येच हे खाद्यपदार्थ / पाककला कुठून आलं? तर त्याचं कारण म्हणजे, आता हे ‘एआय’ तुमच्या किचनमध्येही प्रवेश करू लागलं आहे. स्मार्ट किचन उपकरणे; जसे की ‘एआय’ ओव्हन, स्मार्ट रेफ्रिजरेटर, व्हाइस कमांडवर चालणारे मिक्सर, रोबोट शेफ यांमुळे स्वयंपाकाची अनुभूती आणि पारंपरिक स्वयंपाकघराचा लूकही बदलतो आहे. उदाहरणार्थ, ‘एआय’आधारित ओव्हन स्वयंचलितपणे तापमान आणि वेळ सेट करतो. स्मार्ट रेफ्रिजरेटर आपल्या वस्तूंची यादी ठेवतो आणि गरज पडल्यास मोबाइल अॅपद्वारे खरेदीची आठवण करून देतो.
‘आज जेवायला काहीतरी वेगळं कर, नेहमीचं नको..’ हे घरातल्यांचं वाक्य ऐकू आलं की बहुतांश गृहिणींना, ‘आज काय बनवायचं?’ हा प्रश्न पडतो आणि काय बनवायचं हे ठरवण्यात त्यांचा बराच वेळही जातो. घरामध्ये कुणी तरी डाएट कॉन्शस असतं, तर कुणाची पथ्यपाणी सुरू असतात. हे सांभाळत प्रत्येकाला आवडेल आणि मानवेल असं जेवण बनवणं ही त्या गृहिणीसाठी कसरतच असते. पण, ‘एआय’ आधारित किचन रोबोट आता स्वयंपाकही करू शकतात. काही रोबोट हजारो रेसिपी ‘शिकून’ त्या अचूक रीतीने तयार करतात. केवळ एका क्लिकवर तुम्हाला नेमक्या चवीचे, गरमागरम जेवण मिळते. त्यामुळे श्रमाची आणि वेळेची मोठी बचत होते. याशिवाय, ‘एआय’ अॅप्लिकेशन्स रेसिपीही सुचवतात, आहारातील पोषणमूल्यांचे विश्लेषण करतात आणि डाएट प्लॅनही तयार करतात. म्हणजे ‘एआय’ तुमच्या फिटनेसप्रमाणे किंवा मधुमेह असेल, तर त्यानुसार योग्य आहार योजनेसह रेसिपी सुचवते. यासाठी वापरली जाणारी काही टूल्स पाहू…
Chef GPT : या टूलमध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेले पदार्थ / जिन्नस लिहायचे. तुम्हाला स्नॅक्स, ब्रेकफास्ट, लंच, डीनर यापैकी काय बनवायचे आहे, हे निवडायचे. मग तुमच्याकडे स्वयंपाकाची कुठली साधने आहेत? तुम्हाला किती वेळ आहे? तुम्ही पाककलेत किती निपुण आहात? या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे टूल तुम्हाला रेसिपी सुचवते. फक्त रेसिपीच नव्हे, तर त्यातून तुम्हाला कुठले आणि किती न्युट्रिएंट, किती कॅलरी मिळतील, हेही सांगते. या टूलच्या Paid Version मध्ये तुम्हाला आपल्या डाएटच्या गरजेनुसार आहाराचा प्लॅन बनवून मिळू शकतो. एवढंच काय, त्या रेसिपीला लागणारा एखादा जिन्नस घरात नसेल, तर हे टूल शॉपिंग लिस्टमध्ये त्याची नोंद करून ते ऑर्डरही करते.
Let’s Foodie : हे टूलही Chef GPT सारखेच घरात असलेल्या सामग्रीपासून रेसिपी बनवून देते. पण, याची खासियत अशी की, हे रेसिपीसोबतच पाककलेतील विविध प्रकार, म्हणजे गॅसवर अन्न शिजवणे, बेकिंग, फ्रोझन म्हणजे अन्न थंड करणे यासोबत कोणते अन्न कुठल्या तापमानापर्यंत साठवून ठेवावे, अशा सर्व गोष्टीदेखील सांगते. Meal Practice : हे टूल फक्त रेसिपी न देता तुमच्या डाएटच्या गरजेनुसार / आहारतज्ज्ञांनी सुचवलेल्या तक्त्यानुसार विविध रेसिपी सुचवते. डाएट करणाऱ्या आणि आरोग्याविषयी सजग असलेल्यांसाठी हे टूल उपयुक्त आहे. म्हणजे, टेस्टी भी, हेल्दी भी और व्हरायटी भी.. असं म्हणायला हरकत नाही.
Smart / AI Cooking Assistant : आपण आतापर्यंत जे टूल्स पाहिले ते फक्त रेसिपी देतात. पण, एखादं असं टूल मिळालं, जे संपूर्ण पदार्थ बनवूनच देत असेल, तर हॉटेलसारखं जेवण अगदी रोज घरी बनवता येईल. अगदी आपल्या साध्या मिक्सरसारखं दिसणाऱ्या या मशीनमध्ये एक छोटा वजनकाटा आणि एक छोटी स्क्रीन असते. एक हजाराहून जास्त रेसिपी यामध्ये इन-बिल्ट असतात. स्क्रीनवरून आपल्याला हवी ती रेसिपी सिलेक्ट करायची, ती किती लोकांसाठी बनवायची आहे, हेही सांगायचे आणि आता त्या रेसिपीसाठी लागणारे सगळे जिन्नस त्यांच्या दिलेल्या प्रमाणासह त्यात टाकायचे. हे मशीन कापणे, मळणे, परतणे, ढवळणे, शिजवणे अशा सर्व गोष्टी करून पदार्थ तयार करून देते.
अशा प्रकारची विविध ‘एआय’ टूल वापरून आपण आवडीचे पदार्थ घरच्या घरी लगेच बनवू शकतो, यात शंका नाही. किचन रोबोट तर यापेक्षाही पुढची पावलं टाकत आहेत. ते अगदी आपण जसे हाताने पराठे लाटतो, तशी कृती करून दाखवतात! त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होते, जिन्नसांच्या नेमक्या प्रमाणामुळे अन्नाची चव सुधारते. एकूणच, आज ‘एआय’ आपले किचन स्मार्ट करत आहे. त्यातून उद्या आपला आहार अधिक वैयक्तिकृत आणि आरोग्यदायी होऊ शकेल. कदाचित काही वर्षांनी आपल्या किचनमधून ‘एss आईss’ अशा प्रेमळ हाकेऐवजी ‘एss आयss’ असा सूर ऐकायला येईल. पण, या सगळ्या गोष्टींबरोबर काही प्रश्न नक्कीच उपस्थित होत आहेत.त्यापैकी, ‘माणसांचे स्वयंपाककलेशी असलेले भावनिक नाते आणि हाताने केलेल्या स्वयंपाकाची लज्जत ‘एआय’ आणू शकेल का?’ या कळीच्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी ‘नाही’ असे आहे.
(संपर्कः ameyp7@gmail.com)




