वाई; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार की अजित पवार या संभ्रमावस्थेत असलेल्या वाई-खंडाळा – महाबळेश्वर मतदार संघात अखेर स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे संस्कार व शिकवण अखेर निर्णय घेण्याच्यावेळी कामी आले. द्विधा मनःस्थितीत असलेल्या आ. मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
दोन दिवसांपूर्वी ना. अजित पवार यांच्यासमवेत राहिलेल्या आ. मकरंद पाटील यांनी दुसर्यादिवशी शरद पवार यांच्या गाडीतून एकत्र प्रवास केला. मात्र, तरीही त्यांनी आपण कोणाबरोबर आहे हा निर्णय जाहीर केला नव्हता. या संदर्भात किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर त्यांनी निवडक पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडावीत, असे सुचवण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी कारखान्याच्या उर्जितावस्थेसाठी अजितदादांसमवेत गेले पाहिजे, असे सांगितले. मात्र, बर्याच कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी आ. मकरंद पाटील यांना स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या संस्कारांची आठवण करुन दिली. काहींनी स्व. मदनराव पिसाळ यांचीही आठवण काढली. त्यानंतर आ. मकरंद पाटील यांनी शरद पवार यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, राजेंद्रशेठ राजपुरे, दिलीप बाबा पिसाळ, महादेव मस्कार, मदन आप्पा भोसले, मोहन जाधव, किरण काळोखे, विनायक येवले, डी. बी. खरात, अनिल सावंत, रमेश गायकवाड, चरण गायकवाड, अजित शेेवाळे, मोहन चव्हाण, अनिल पवार, बाळासाहेब चिरगुटे, सुधीर भोसले, राजाभाऊ सोनावणे, कांतीलाल पवार, दीपक बाबर, उदय कबुले, ज्ञानोबा शिंगटे, संतोष बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.








