
Leh Ladakh Hanle Darkest Sky Reserve : हल्ली आकाशात रात्रीच्या वेळी पाहिलं, तर लुकलुकणारे तारे, चांदण्या दिसण्याचं प्रमाण तुलनेनं बरंच कमी झालं आहे. यामागे कैक कारणं असून त्यातची बरीच कारणं सर्वज्ञाच आहेत. मात्र जिथं प्रदूषणाची पातळी वाढत आहे तिथंच भारतात निसर्गाचा एक कमाल आविष्कार येणाऱ्या प्रत्येकालाच हैराण करून सोडत आहे. हा आविष्कार कुठंय माहितीये?
हा आविष्कार म्हणजे भारतातील अतिशय दुर्गम भागात असणारं एक लहानसं गाव. एक असं गाव, जिथं बाहेरचं कोणी गेलं, तर त्यांची दमछाक होते, थंडीनं दाकखिळी बसते, एक असं गाव जिथं दूरदूरपर्यंत कोणीच नसल्यामुळं रात्रीच्या वेळी इथं नुसतं बाहेर वावरणंही धडकी भरवतं. जगातील आणि भारतातील काळोख्या रात्रींसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि अवकाश अगदी सहजपणे दिसणाऱ्या या ठिकाणाचं, या गावाचं नाव आहे हान्ले/ हानले.
हानले (Hanle) हे लडाखमधील एक अतिशय लहानसं आणि दूरवर वसलेलं एक गाव. लडाखच्या पूर्व भागात, चांगथांग पठारावर हे गाव स्थित असून, लेहपासून ते साधारण 250 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे हे गाव साधारण 4,500 मीटर (14,760 फूट) उंचीवर वसलेलं असून, ते आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासह खगोलशास्त्रीय महत्त्वासाठीही प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये हानलेच्या दिशेनं येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला असून, या बदलाला खगोलशास्त्रीय पर्यटन असंही नाव देण्यात येत आहे.
जगातील सर्वात उंचावरील वेधशाळा
हानले येथील वेधशाळा ही जगातील सर्वात उंचावरील वेधशाळांपैकी एक आहे. ही वेधशाळा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थांकडून विविध निरीक्षणपर कामांसाठी वापरली जाते. हानलेमध्ये फारच कमी वस्ती आणि कोणतेही शहरीकरण नसल्यामुळं इथं कृत्रिम प्रकाशाचा प्रचंड अभाव आहे, ज्यामुळे येथील रात्र सर्वाधिक काळ्याकुट्ट आणि काशी धडकी भरवणाऱ्या असतात. 2022 मध्ये हानले हे ठिकाण भारताचा पहिला “Dark Sky Reserve” म्हणून घोषित करण्यात आला आणि साऱ्या जगाचं लक्ष या ठिकाणानं वेधलं. खगोल अभ्यासक आणि ग्रहताऱ्यांमध्ये रमणाऱ्यांसाठी हानले म्हणजे एक परवणी.
इथं रात्री फक्त ‘ताऱ्यांचा’ खेळ चाले….
दिवस मावळतीला गेल्यानंतर आणि आकाश जेव्हाजेव्हा निरभ्र असेल तेव्हातेव्हा हानलेमध्ये रात्रीच्या अंधारात काही अद्वितीय दृश्य आणि ग्रहतारे पाहता येतात. मिल्की वे अर्थात दुसऱ्या आकाशगंगा इथून अगदी सहजपणे आणि त्यासुद्धा कोणत्याही दुर्बिणीशिवाय पाहया येतात. उल्कावर्षा, तुटणारे तारे, ताऱ्यांचा वर्षाव, चंद्र, ग्रह आणि उत्तरेकडील प्रकाशरेषा असा अद्भूत नजराणा हानले इथं येणाऱ्या प्रत्येकापुढं सादर करतं.
राहिला मुद्दा इथवर पोहोचण्याचा तर, लेहपासून इथं येण्यापर्यंतचा प्रवास तुलनेनं अधिक खडतर आहे. शिवाय चीन सीमेनजीक हा भाग येत असल्यानं अनेकदा इथं काही संवेदनशील भाग ओलांडून पोहोचावं लागतं. प्रवास कितीही मोठा असला तरीही हानलेमध्ये येऊन जेव्हा आपल्याला नगण्य भासवणारी भव्य आकाशगंगा आभाळात दिसते तेव्हा इथं येण्याचं खरं चीज झाल्याचीच एकमेव भावना मनात घर करते. मग….. जाणार ना हानलेला?